जागतिक व्यापारावरही परिणामांची भीती

जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनला करोनाच्या उद्रेकाने जायबंदी केल्याने जागतिक उद्योगधंद्यांवर त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून भारतीय उद्योग जगतात चलबिचल सुरू आहे. दुसरीकडे चिनी वस्तूंचे मुंबई, दिल्लीतील व्यापारीही आयात आटण्याच्या शक्यतेने धास्तावले आहेत.

करोना प्रादुर्भावाचा परिणाम भारतावर कमीत कमी होईल, असा अंदाज बांधला जात आहे. किंबहुना चीनमधून येणाऱ्या वस्तूंची आयात कमी होण्याच्या शक्यतेमुळे भारतातील रंग आणि रसायन यांसारख्या उद्योगांसाठी चीनमधील परिस्थिती तूर्त फायद्याची ठरेल असा कयास आहे.

READ:  चीनची भारताला साथ, पाकिस्तान विरोधात घेतली भूमिका

जगातील वेगवान अर्थव्यवस्था थंडावण्याचा परिणाम जागतिक उद्योगांवर होणे स्वाभाविक आहे. विशेषत: धातू उत्पादन आणि उपभोग्य वस्तूनिर्मितीत जगात निम्म्याहून अधिक वाटा असलेल्या चीनमधील करोना उद्रेक धातू उद्योगाला धास्तावणारा आहे. तथापि, चीनमधून धातूचा व्यापार थंडावण्याचा फायदा भारतीय कंपन्यांना होईल की नाही, याबद्दल आताच काही भाकीत करणे अवघड असल्याचे ‘एडेल्वाइज’मधील विश्लेषक अमित देसाई यांनी सांगितले. भारतातील औषधे, खत, कृषी रसायनांच्या उत्पादनाची मदार चीनमधून येणाऱ्या कच्च्या मालावर आहे. दीर्घावधीसाठी हा पुरवठा खंडित झाल्यास त्याचे या क्षेत्रातील उद्योगावर परिणाम दिसतील, असे ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’चे विश्लेषक नीलेश घुगे यांचे निरीक्षण आहे.

करोना साथीचे सावट जागतिक व्यापारावर आहे. त्याचा परिणाम खनिज तेल आणि आयात होणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमतीवर झाला आहे. खनिज तेलाची आयात किंमत जवळपास १३ टक्क्यांनी घसरून प्रतिपिंप ५४ डॉलरखाली म्हणजे १३ महिन्यांच्या नीचांक स्तरावर येणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी शुभसूचकच असल्याचे मोतीलाल ओसवालचे सिद्धार्थ खेमका यांनी सांगितले. रुपयाचे विनिमय मूल्य यातून सुधारले असून, सोन्याच्या किमतीही घसरल्या असल्याचे आढळते.

करोनाच्या उद्रेकाचे मुख्य केंद्र असलेले वुहान हे चीनमधील हुबेई प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. ते जागतिक रसायन उद्योगाचे प्रमुख उत्पादन केंद्र आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे तेथील उद्योग थंडावणे हे भारतातील रंग, रसायन उद्योगाला तात्पुरते फायद्याचे ठरेल, असे निरीक्षण नोंदविणारा अहवाल जेएम फायनान्शियल या दलाली पेढीने प्रसिद्ध केला आहे.

करोना उद्रेकामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर नाममात्र परिणामांची शक्यता आहे.

– कृष्णमूर्ती सुब्रमणियन, मुख्य आर्थिक सल्लागार

करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर दुष्प्रभाव पडू शकेल, परिस्थितीला तोंड देण्यासाठी योजना आवश्यक आहे.

– शक्तिकांत दास, रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर

.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here